दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.९,
अनधिकृत इमारतींचा सुळसुळाट असलेला प्रभाग ; या निवडणुकीत परिवर्तन अटळ,
प्रभाग क्र.९ हा अत्यंत गजबजलेला असा प्रभाग आहे.या प्रभागात परप्रांतीयांचे प्रचंड प्राबल्य आहे.त्यामुळे या प्रभागात मराठी माणसाला उमेदवारी देणे,म्हणजे ” हात दाखवून अवलक्षण,” करून घेण्यासारखे आहे.गेल्या दोन निवडणुकीत या प्रभागात बहुजन विकास आघाडीने बाजी मारली होती.पण या निवडणुकीत त्यांना ते शक्य होणार नाही.या प्रभागात गेल्या दहा वर्षात बेसुमार अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,त्यांचे जनक कोण आहेत,हे सांगायला नको.गेली दहा वर्षे येथील परप्रांतीय मतदार हा बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान करत आला.पण या निवडणुकीत हा मतदार भाजपकडे वळेल,अशी शक्यता आहे.हा प्रभाग देखील अस्वच्छ प्रभाग म्हणून ओळखला जातो.एकमेकांना लागून अनधिकृत इमारती उभारण्याची समाजकंटकामध्ये जणू स्पर्धाच लागली होती.
विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रभागात गेल्या दहा वर्षात एकही तोडक कारवाईची मोहीम राबवली नाही,त्यामुळे या प्रभागात आजच्या घडीला हजारो अनधिकृत इमारती डौलात उभ्या आहेत.
हा संपूर्ण प्रभाग संमिश्र लोकवस्तीचा असून मराठी लोकांची संख्या नाममात्र. आहे.या प्रभागाला उत्तर भारतीयांचा प्रभाग,म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.प्रभागात अनेक हिंदी शाळा असून या शाळेच्या सर्व इमारती अनधिकृत आहेत.कोंबड्याच्या खुराड्यात जशा कोंबड्या कोंबण्यात येतात,तसे या प्रभागात मुलांना कोंदट वातावरणाच्या वर्गात कोंबण्यात येते.या अशा इमारतीमध्ये एखादी अप्रिय घटना घडली तर साधी अँब्युलन्स व अग्निशमन दलाचे वाहन जायला रस्ता नाही.पण या सर्व गैरसोयीकडे स्थानिक नगरसेवक व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले.
सुमारे ४२ हजार ४५२ हजार मतदार असलेल्या या प्रभागात अनेक अनधिकृत इमारतीना पाणी व वीज या सुविधा कशा काय मिळतात,याची चौकशी केल्यास पाणी व वीजचोरी कोणाच्या आशीर्वादाने होते हे उघडकीस येऊ शकते.या प्रभागात रस्त्याची साफसफाई व आरोग्य सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.हा प्रभाग ठेकेदारांसाठी ” मलईदार,” असा प्रभाग आहे.कामे न करता बिले कशी काढायची,याविषयी सुरस कथा या प्रभागातील स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतात.” कुंपणच कसे शेत खाते,” याचे हे उत्तम उदाहरण आहे.प्रभाग क्र.९ हा
याबाबत रोलमॉडेल ठरला आहे.
असो,या प्रभागात विजय नगर,मोरेगाव, नगीनदासपाडा,गायत्री मंदिर,मोरेगाव डोंगरी,भास्कर कॉम्प्लेक्स, श्रीदत्त नगर,आंबेडकर परिसर,एकता नगर,तू हॉस्पिटल,सर्वोदय वसाहत,वर्धमान नगर मथुरा
नगर,दामोदर नगर,झेड.पी.स्कूल परिसर व सेवालाल नगर या भागाचा समावेश आहे.एकता नगर ते सेवालाल नगर दरम्यान असलेल्या भागात गुजराती समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे.येथील मतदार गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला होता.त्यांनी या प्रभागात शिवसेना ( उबाठा ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडीला डोके वर काढू दिले नव्हते.या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.स्थानिक नगरसेवक व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रभाग अनधिकृत इमारती उभारणाऱ्या समाजकंटकांना आंदण दिल्यामुळे येथील रहिवाश्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.त्याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

