जव्हार प्रतिनिधी
जव्हार येथे तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग, जिल्हा परिषद पालघर तथा पंचायत समिती जव्हार यांच्यातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह, जव्हार येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा गटविकास अधिकारी,पंचायत समिती जव्हार हे होते.यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रतिनिधी,सरपंच महिला प्रतिनिधी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संचालक,स्वदेश फाऊंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सदर अभियानाची पार्श्वभूमी,उद्दिष्टे, विविध घटक,अभियानाचा कालावधी तसेच अभियान दरम्यान ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणांनी पार पाडावयाच्या भूमिका, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर सदर अभियाना विषयी उपस्थित सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यानंतर स्वदेश फाऊंडेशनचे संचालक यांनी फाऊंडेशनच्या ग्रामीण विकासासाठी सुरू असलेल्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.यावेळी बुधानी ट्रस्टच्या प्रतिनिधीने संस्थेच्या उपक्रमांची ओळख करून दिली व ग्रामविकास प्रक्रियेत अशा संस्थांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी,पेसा मोबाईलायझर,ग्रामरोजगार सेवक तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुका पातळीवर अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी दिशा मिळाल्याचे समाधान सर्वत्र व्यक्त करण्यात आले.शेवटी वंदे मातरम गीताने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

