सुहास करंदीकर,मुंबई
” अमृताच्या जणु ओंजळी,” पुस्तकाचे शानदार सोहोळ्यात प्रकाशन,
काल दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले येथे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथितयश प्रकाशन संस्था, डिंपल पब्लिकेशन, जीवनगाणी आणि स्वरगंधार या तीन संस्थाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून,त्यांच्या आयुष्यातील सांगितिक प्रवासावर,प्रकाश टाकणारे पुस्तक, “अमृताच्या जणू ओंजळी” हे डिंपल पब्लिकेशनतर्फे व सांस्कृतिक मंत्री आशिश शेलार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. रसिकमान्य संगीतकार,श्रीधर सुधीर फडके यांच्या जीवनातील संगीताच्या टप्प्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे शब्दांकन, सुकन्या जोशी,या हरहुन्नर निवेदिका व लेखिकेने केले आहे.सदर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, येथे काल पार पडला.हा कार्यक्रम म्हणजे संगीत प्रेमी व वाचन प्रेमी रसिकाना अभूतपूर्व मेजवानीच होती.
आपल्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षात, यशस्वीरित्या पदार्पण करणाऱ्या डिंपल प्रकाशन संस्थेने आजपर्यंत अकराशेहुन अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.रसिकमान्य लेखकांची लेखनकला,वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे बहुमूल्य काम डिंपल पब्लिकेशन करत आहे. गेली पन्नास वर्षे अनेक लेखकांच्या प्रतिभेला मूर्त किंवा शब्दरूप देऊन, रसिकांना त्यांचा आनंद उपभोगायला मदत करण्यात, डिंपल पब्लिकेशन ही संस्था अग्रेसर आहे.उत्कृष्ट दर्जाच्या पहिल्या दहा प्रकाशन संस्थांमध्ये नामांकन असलेली डिंपल प्रकाशन ही रसिकमान्य प्रकाशन संस्था असून,या संस्थेचे सर्वेसर्वा,अशोक मुळे यांना,या वर्षी जीवनगौरव पुरस्काराने अलंकृत करण्यात आले आहे.श्रीधर फडके यांच्या,या पुस्तक प्रकाशनाचे औचित्य साधून,जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि स्वरगंधारचे मंदार कर्णिक प्रशांत लळीत संचालित वाद्यवृंदासह ” झाले मोकळे आकाश,” हा, श्रीधर फडके रचित गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमात अनेक दिग्गज गायकांनी हजेरी लावली होती.ऋषिकेश रानडे, अभिषेक नलावडे,धनश्री देशपांडे,शिल्पा पुणतांबेकर आणि सोनाली कर्णिक या गायकांबरोबर स्वतः श्रीधर फडके यांनी गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर उपेंद्र भट यांनी देखील श्रीधर फडके रचित अभंग गाऊन रसिकांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तूरा म्हणजे,सुरेश वाडकर यांचे गायन होय.त्यांनी दोन गाणी सादर करून रसिकांचे कान तृप्त केले.
या कार्यक्रमात,प्रेक्षक आणि वाचकांना अजून एक मेजवानी म्हणजे,सहाशे रु. किंमतीचे सदर पुस्तक डिंपल पब्लिकेशनतर्फे काल सवलतीच्या दरात म्हणजे फक्त ३०० रु.त वाचकाना उपलब्ध होते.
अनेक प्रसिद्ध लेखकांची प्रतिभा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या,डिंपल पब्लिकेशन संस्थेच्या या पवित्र कामाचा वारसा,अशोक मुळे यांनी त्यांचे चिरंजीव,कौतुक मुळे यांच्या हाती देऊन हे यज्ञ कर्म सुरू ठेवले आहे.त्यामुळे वाचकांना दर्जेदार साहित्य मेजवानीचा वसा डिंपल पब्लिकेशन कायम सुरू ठेवेल,याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्नेश जोशी आणि स्मिता गवाणकर यांनी केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

