दीपक मोहिते,
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन विजयी,
भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आज ही निवडणूक पार पाडली., लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय बलाबाल लक्षात घेता एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन हमखास निवडून येतील,असा अंदाज होता.अपेक्षेप्रमाणे सी.पी राधाकृष्णन यांनी इंडिया गटाचे बी.सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला.
भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले.या निवडणुकीत एकूण ९८ टक्के मतदान झाले.त्यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार न्या.बी.सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली.यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला.
आज सकाळी १०.०० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ते चालले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले.त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह,अर्जुन राम मेघवाल आणि किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश,भाजपा खासदार कंगना राणावत आणि सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान केले.काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणुकीत मतदान केले.
या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती ( ४ राज्यसभा खासदार ),बिजू जनता दल ( ७ राज्यसभा,शिरोमणी अकाली दल १ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार यांनी मतदानात भाग घेतला नाही.२१ जुलै रोजी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करण्यास पात्र होते. इलेक्टोरल यादीमध्ये एकूण ७८८ सदस्य आहेत.त्यापैकी राज्यसभेचे २४५ आणि ५४३ लोकसभेचे आहेत.सध्या या सदस्यांची एकूण संख्या ७८१ आहे.कारण राज्यसभेत ६ आणि लोकसभेत १ जागा रिक्त आहेत.अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी ३९१ मतांची आवश्यकता होती.राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी.मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्या.सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची ३०० मते मिळाली.
या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले.ते एक्सवर म्हणाले, “ भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन करतो.तळागाळातून वर आलेले नेते म्हणून तुमची विवेकबुद्धी आणि प्रशासनाबद्दलचे सखोल ज्ञान आपल्याला आपल्या संसदीय लोकशाहीची कामगिरी पार पाडण्यासाठी मदत करेल,असा माझा ठाम विश्वास आहे. वरिष्ठ सभागृहाच्या पावित्र्याचे रक्षक म्हणून तुमच्या प्रवासासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो.” निवडणूक संपल्यानंतर विरोधी पक्षांनीही नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले.

