जव्हार प्रतिनिधी,
धोपटपाडा गावात रानभाज्यांचा मेळावा,
जव्हार तालुक्यातील रायतळे ग्रामपंचायत क्षेत्रात धोपटपाडा येथे स्थानिक महिलांच्या पुढाकाराने रानभाज्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या अनोख्या उपक्रमात रानभाज्यांपासून बनवलेले विविध पारंपरिक पदार्थ सादर करण्यात आले.सदर रानभाज्या मेळाव्यात खुरसणीचा पाला,कोहरूळ, कुरडू, शिंद,करटोली,इ. जवळपास १७ प्रकारच्या विविध रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती.
प्रत्येक स्टॉलवर त्या भाजीचे पौष्टिक गुणधर्म, औषधी फायदे आणि पाककृतीची माहिती देण्यात आली.गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
यावेळी वयम चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर, भरत पाटारा व महेंद्र पाटारा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रानभाज्या महोत्सव हा कार्यक्रम पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणे,आरोग्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच अशा कार्यक्रमामुळे शहरी भागातील लोकांनाही ग्रामीण भागातील पारंपरिक व औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यांची ओळख होते.त्यामुळे या भाज्यांना बाजारपेठ मिळून स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.दरम्यान, याच कार्यक्रमाच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

