जव्हार,प्रतिनिधी,
झाप ग्रा.पं.च्या ग्रामसभेत विकासाचे अनेक ठराव संमत,
जव्हार तालुक्यातील झाप ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी वातावरणात पार पडली.या ग्रामसभेत शिक्षण,आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देणारे अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
या ग्रामसभेत नाशिक येथे सुरू असलेल्या रोजंदारी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. शिक्षकांना बाह्य स्त्रोतांमार्फत आदेश न देता थेट रोजंदारीवरच नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारक मध्यस्थी टळून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची हमी मिळणार आहे.तसेच शालेय मुलांना मिळणारे मध्यान्ह भोजन पुन्हा शाळांमधूनच देण्यात यावे,असे ठरवण्यात आले.या निर्णयामुळे मुलांना ताजे व पौष्टिक अन्न मिळणार असून,स्थानिक स्वयंपाकी महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.तसेच बैठकीत सामाजिक आरोग्यास बाधा आणणाऱ्या जुगार,मटका,हातभट्टी व बनावटी दारू, तसेच पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार आणि गुटखा यावर कडक बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्यामुळे गावातील तरुणाईला व्यसनमुक्त जीवन जगता येणार असून सामाजिक वातावरण अधिक निरोगी होईल.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव प्लास्टिक व कचरामुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे गावाचे पर्यावरण सुरक्षित राहील आणि झाप हे स्वच्छ-सुंदर गाव म्हणून इतरांसमोर आदर्श ठरेल.तसेच जनजीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील पाणीपुरवठा डिसें. महिन्यापर्यंत पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठराव मंजूर करण्यात आला.ग्रामसभेस ग्राम विकास अधिकारी,उपसरपंच सर्व अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,जिल्हा परिषद शिक्षक,आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

