सुरेश काटे, तलासरी,
वडवली पुनर्वसन शाळेत सुसज्ज ग्रंथालय,
तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन या शाळेत बुधवारी आधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमास तलासरी तालुक्याचे सहा. गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे,गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते आणि यशराज रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपाली भानुशाली यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यशराज रिसर्च फाउंडेशनने तलासरी तालुक्यातील २५ शाळांमध्ये दर्जेदार वाचनसाहित्याने समृद्ध ग्रंथालये उभारण्याचा उपक्रम हाती घेतला होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण करून २५ शाळांना दर्जेदार ग्रंथालय निर्माण करून दिली आहेत.
या ग्रंथालयात आवश्यक फर्निचर,टेबल,खुर्च्या,कपाटे, ग्रंथालय चालवण्याची संपूर्ण प्रणाली,आकर्षक भिंत पेंटिंग, स्टेशनरी,घड्याळ,चटई तसेच घरी पुस्तक वाचनासाठी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानसंपन्न व प्रेरणादायी वातावरण शाळांमध्ये तयार करणे आणि शैक्षणिक प्रगतीस चालना देणे असा आहे.लोकार्पण प्रसंगी मान्यवरांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन यशराज रिसर्च फाउंडेशन आणि जिल्हा परिषद शाळा वडवली पुनर्वसन यांनी केले.

