वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्याच्या दहीहंडी उत्सवात मराठीचाच जागर…
मराठी हिंदी भाषा वाद सुरू असून मनसे व शिवसेनेने हा मुद्दा महत्वाचा केला असतानाच आज झालेल्या दहीहंडी उत्सवावातही मराठीचा जागर पहावयास मिळाला.आम्ही नारेकर गोविंदा पथकाने ” महाराष्ट्रात फक्त मराठी “असे फलक झळकावून मराठीचा जागर केल्याचे पहावयास मिळाले.
दही हंडी उत्सव आज देशभर साजरा केला जात असुन शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या उत्सवात गोविंदा पथकांना हजारो रू.ची बक्षीसे ठेवण्यात आली होती.कुडूस येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गोविंद पाटील यांच्या नवनिर्माण कला क्रिडा व सामाजिक संस्थेच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात ६१ हजार रू.चे प्रथम तर महिलांसाठी ११ हजार रू.चे बक्षीस ठेवण्यात आले होते.भाजपातर्फे मंगेश पाटील यांच्या दहीहंडीत ७२ हजारांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते तर वाडा येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीला ५१ हजारांचे रोख बक्षीसांसह आकर्षक चषके ठेवण्यात आली होती.
दहीहंडी उत्सवासाठी वाड्यातील अनेक गावातील गोविंदा पथके गेल्या महिन्यापासून सराव करत होती.तालुक्यातील नारे गावातील ” आम्ही नारेकर गोविंदा पथक,” हे गोविंदा पथक विशेष चर्चेत होते.या गोविंदा पथकात हिंदू तरुणाबरोबर मुस्लिम तरूणही सहभागी झाले होते.त्याचबरोबर या पथकाने ” महाराष्ट्रात फक्त मराठी,” असे फलक झळकावून मराठीचा जागर केला.हे फलक या गोविंदा पथकाचे विशेष आकर्षण ठरले.या गोविंदा पथकासोबत चिंचघर येथील आई गावदेवी गोविंदा पथकानेही अनेक बक्षीसे पटकावली आहेत.

