वसंत भोईर,वाडा
चिंचघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची निवड
तालुक्यातील चिंचघर या प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली.या निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सत्ताधारी कमिटीला धक्का देत भाजपचे कैलास ठाकरे हे निवडून आले.त्यांच्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
चिंचघर या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या दहा असून या ग्रामपंचायतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सत्ता असून त्यांचे पाच तर भाजपचे पाच सदस्य होते.या ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मनेश पाटील यांनी आपल्या पॅनल मध्ये ठरलेल्या समझोत्यानुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.तसेच याच पॅनलच्या अन्य एका सदस्याचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्यानमुळे सत्ताधारी पक्षाचे चार सदस्य उरले होते.
आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणूकीत कैलास ठाकरे यांना पाच तर सत्ताधारी पॅनलचे गिरीश पाटील यांना चार मते मिळाल्याने उपसरपंचपदाची माळ कैलास ठाकरे यांच्या गळयात पडली.कैलास यांची निवड होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.सत्ताधारी पॅनलला जोरदारब धक्का बसल्यामुळे या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत आहे.
