सुरेश काटे,तलासरी
तलासरीमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा,
दुर्गम डोंगरी व जंगलात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन जाहीर केला आहे.
आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
तलासरीमध्ये ही आदिवासी दिना निमित्त आदिवासी पारंपारिक वाद्य तारपामधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य,तूर आणि थाळीतून कानी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन आज विद्यार्थ्यांकडून घडवण्यात आले.एकमेकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर,लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले.
आदिवासी संस्कृती व परंपरा , कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी,समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा, निसर्गाशी नाते निर्माण व्हावे. यासाठी आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडवा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर, दऱ्या-खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा या उद्देशाने आज जागतिक आदिवासी दिनी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी तलासरी पोलिसाकडून योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

