वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यात राख्यांनी बाजारपेठा सजल्या,
रक्षाबंधन सणासाठी वाडा तालुक्यातील वाडा शहर, कंचाड,खानिवली,शिरीष पाडा,कुडूस,अबिटघर परिसरातील बाजारपेठेतील अनेक दुकाने विविध प्रकारच्या राख्यांनी फुलली आहेत.भाऊरायाच्या पसंतीस उतरेल,अशी राखी घेण्यासाठी महिलांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींसाठी विविध भेटवस्तू खरेदी करण्यात युवा वर्ग व्यग्र झाला आहे.
यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांनी सांगितले. कुंदनवर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे. चिमुकल्यांसाठी लाइटिंग राख्या,छोटा भीम,डोरो माॅन, मोटू पतलू,श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.लाइटिंग,लाकडी पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखीला ही मागणी आहे. यंदाही स्पिनर लाइटिंग राकेश असलेले बटन दाबले की विविध रंगीत लाइटिंग लागत असून या राखीला विशेष मागणी आहे.
वाडा, कुडूस, शिरीष पाडा येथील बाजारपेठेत कमीत कमी पाच ते १० रु.पासून अगदी ७० ते ८० रआणि त्याहूनही अधिक किमतीच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.बाहेरगावी तसेच कामानिमित्त असलेल्या भाऊरावांना पोस्टाने वेळेत राखी पोहोचवण्यासाठी आधीपासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. व्यवसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
यंदा मागणी वाढली असतानाच नाविन्यपूर्ण राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.नवनवीन प्रकारच्या विविध रंगीबेरंगी राख्या महिलांना आकर्षित करत आहेत.यंदा राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे.

