जव्हार, प्रतिनिधी,
आदिवासी कोकणा जमात सत्कार सोहळा संपन्न,
आदिवासी कोकणा जमात प्रतिष्ठान, पालघर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सन २०२३ ते २०२५ या कालावधीत शासकीय सेवेत रुजू झालेल्या कोकणा समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच आचार्य भिसे हायस्कूल कासा येथे उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जयपाल मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यसैनिक रेवजीभाई चौधरी आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये,आदिवासी समाजातील पालघर जिल्ह्यातील पहिले सनदी अधिकारी डॉ.अजय डोके, माजी आ.सुनील भुसारा,जेष्ठ साहित्यिक लक्ष्मण टोपले, कोकणा समाज माजी अध्यक्ष रामचंद्र कामडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यदुनाथ भोये यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला व समाजप्रबोधनावर भर देण्याची गरज अधोरेखित केली.त्यानंतर कोकणा समाजातील डॉक्टर, प्राध्यापक,गटविकास अधिकारी आदी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी झालेल्या सत्कार सोहळ्यात परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या कोकणा समाजातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.डॉ.अजय डोके यांचा व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यानंतर आ. हरिश्चंद्र भोये व माजी आ. सुनील भुसारा यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले. अध्यक्ष संदीप साठे यांनी आपल्या भाषणात कोकणा समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ भुसारा व किशोर डोके यांनी केले.

