वसंत भोईर, वाडा
वाडा तालुक्याच्या खानिवली गावात किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग,
तालुक्यातील खानिवली गावातील ” जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स, ” या दुकानाला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून या आगीत लाखो रू.चे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे ही आग अपघाती नसून कोणीतरी लावली असावी,असा संशय दुकान मालकाने व्यक्त केला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार,खानिवली बाजारपेठेत ‘ जय हरी प्रसाद किराणा अँड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून या दुकानात खाद्यपदार्थ,किराणा साहित्य,रोजच्या वापराच्या घरगुती वस्तू,जनरल वस्तू तसेच काही महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री होत असते.काल रात्री दुकानाला अचानक आग लागली,आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले स्थानिक नागरिकांना आग लागल्यांचे माहित होताच, त्यांनी तत्काळ वाडा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.मात्र अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत दुकानातील सर्व सामान आगीत जळून खाक झाले होते.
या आगीत लाखो रू.चे नुकसान झाले असून ही आग कोणीतरी लावली असावी, असा संशय दुकानाचे मालक दुंदाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.या आगीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.वाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

