जव्हार प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची श्रावणी सोमवार विशेष सेवा,
पालघर विभाग रा.प. महामंडळाच्या जव्हार आगारातर्फे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी खास “ जव्हार – नाशिक दर्शन,” विशेष बस फेरीची घोषणा करण्यात आली आहे. ही बस फेरी शनिवार व रविवार वगळता प्रत्येक श्रावणी सोमवारसाठी उपलब्ध होणार आहे.सदर प्रवासात जव्हार-त्र्यंबकेश्वर-नाशिक-वणी ( सप्तशृंगी गड )- रेणुका माता मंदिर-शिर्डी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.या दर्शन फेरीचे एकूण तिकीट दर केवळ रु. ९४६/- इतके असून,भाविकांना ही सेवा परवडणारी आहे.
प्रवाशांसाठी खास सवलती:
७५ वर्षांवरील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा,
“ महिला प्रवासी सन्मान योजना,” अंतर्गत सर्व महिलांना तिकीट दरात ५० % सवलत.
पूर्ण तिकिट घेणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन किंवा संगणकीय रिझर्वेशन केल्यास १५ % सवलत मिळणार,
ही सुविधा मोबाईल अॅप व संगणकीय आरक्षण प्रणालीवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली असून, भाविकांनी आरक्षण करून आपला प्रवास सुखकर व निश्चित करावा,असे आवाहन रा.प.महामंडळाच्या जव्हार आगाराकडून करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे स्थानक प्रमुख उषा घुगे यांनी सांगितले.

