सचिन पाटील,विरार
विरार येथे ” साईक स्पेक्ट्रम २०२५” डिजिटल स्पर्धेचे आयोजन,
युवा पिढीच्या मानसशास्त्राचे सखोल आकलन करणे,हे त्यांचे कल्याण आणि सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.मानसिक आरोग्य ते डिजिटल,वित्त आणि सामाजिक गतिशीलता यांसारख्या प्रचलित ट्रेंडबद्दल जागरूकता निर्माण केल्यामुळे तरुणांना या विश्वाशी जोडण्यास मदत होते. ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेने विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
विवा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या अभिनव आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.या स्पर्धेप्रसंगी विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,उप प्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका रश्मी सावंत इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, ज्यात सोनपंत दांडेकर महाविद्यालय पालघर,एम. एच.मेहता महाविद्यालय पालघर,आचार्य मराठे महाविद्यालय चेंबूर,सेंट अँड्र्यूज महाविद्यालय,वांद्रे आणि भवन्स कॉलेज सारख्या महाविद्यालयांचा समावेश होता.१०० हून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
मीम मेकिंग,वन ॲक्ट प्ले इन वन मिनिट,
डिजिटल / हस्तनिर्मित पोस्टर मेकिंग,कार्टून स्ट्रिप मेकिंग, रील मेकिंग,आरोग्य आणि युवा,मानसिक आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती,तरुणांमध्ये लैंगिक जागरूकता, तरुणांमध्ये नैराश्य आणि आत्महत्या,तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन,वित्त आणि युवा,क्रिप्टो करन्सीचा वापर, आर्थिक अवलंबित्वामुळे आलेली असहाय्यता, तरुणांमध्ये आर्थिक जागरूकता,काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन, कौटुंबिक अपेक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्य,सामाजिक जीवन आणि युवा,लिंगभेद आणि युवा,अशा युवा मानसशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर सर्जनशीलपणे विचार करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
मानसशास्त्र विभाग प्रमुख रश्मी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कु. शिवम वाल्मीकी आणि प्रथम/ द्वितीय वर्षाच्या बी.ए च्या सुमारे ६० विद्यार्थ्यांच्या समर्पित संघाने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
सदर उपक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर,संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर,संस्थेचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर,महाविद्यालयाच्या समन्वयक नारायण कुट्टी , व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील,श्रीनिवास पाध्ये,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

