दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
चड्डी-बनियन गँग ; सरकारची अब्रु चव्हाट्यावर,
काल विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या उच्छादावर सभागृह व सभागृहाबाहेर ज्या पद्धतीने हल्ला चढवला,त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बोलती बंद झाली.आ.आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या घणाघाती भाषणात मंत्रीमंडळातील चड्डी-बनियन गँगवरून फडणवीस सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली.त्यामुळे महायुतीच्या अनेक आमदारांच्या अंगाची लाही लाही झाली.शिंदे गटाचे आ.निलेश राणे यांनी तर भर सभागृहात अनावश्यक केकाटणेच सुरू केले होते.पण त्यांच्या केकाटण्याची फारशी कोणी दखल घेतली नाही.या सर्व घडामोडीमुळे आदित्य ठाकरे यांचा तीर सत्ताधारी पक्षाच्या वर्मी बसल्याचे स्पष्ट झाले.या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर चड्डी- बनियन घालून आगळे वेगळे आंदोलन केले.या सर्व घडामोडीमुळे महायुती सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
विधिमंडळात सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे चड्डी बनियन गँगचा.एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांनी आपल्याला आमदार निवासात उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांनी शिळं जेवण दिल्यामुळे संतप्त होऊन कँटीनच्या मॅनेजरला जबर मारहाण केली होती.तोकड्या कपड्यांवर असलेल्या गायकवाड यांचा हा मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले.आदित्य ठाकरेंनी सभागृहात चड्डी बनियन गँग म्हणत शिंदे गटाचा डीवचलं होतं.त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं.या घटनेनंतर आज काही आमदार विधानसभा आवारात बनियन घालून आले होते.कमरेला टॉवेल गुंडाळला होता.यावेळी त्यांनी चड्डी बनियन गँगच्या घोषणाही दिल्या.
सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ), शिवसेना ( ठाकरे ) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियन घातली होती.कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सतेज पाटील,महेश सावंत या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की,चड्डी बनियन गँगने महाराष्ट्रात हैदोस घातला आहे.कँटिनमध्ये जाऊन आमदार कर्मचाऱ्याना मारहाण करतात,कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवत असतात,कुणी चड्डी-बनियानवर घरात बसून ” ओम फट स्वाह:,” म्हणतं.पूर्वी चड्डी बनियन गँगची दहशत महाराष्ट्रात होती.ही गँग शेतात,वस्त्यांवर दरोडे टाकायची,आताची चड्डी बनियन गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
संजय गायकवाड गेल्या आठवड्यात आमदार निवासातील कँटिनमध्ये बनियान आणि टॉवेलवर जाऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.तसंच याच दरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.ज्यामध्ये ते आपल्या बेडरुममध्ये बनियनवर बसलेले दिसत होते.त्याआधी मंत्री भरत गोगावले यांच्याही घरातील टॉवेलवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यामुळे राज्यात चड्डी बनियन गँग पुन्हा सक्रिय झाली की काय ? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे. या सर्व घटनामुळे सरकारची अब्रु चव्हाट्यावर आली आहे.

