जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे लोकसंख्या दिन साजरा,
जव्हार तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे काल जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एम.आर.मेश्राम आणि उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमात इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.शैलेश बगडाने यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सखोल ऊहापोह केला.त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे प्रा.महेंद्र जाधव आणि प्रा.प्रताप देवरे यांनीही आपल्या भाषणातून लोकसंख्या नियंत्रणच्या आर्थिक आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक म्हणून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विनायक खातळे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपस्थित मान्यवरांचे,प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्यांनी लोकसंख्येच्या व्यवस्थापनाचा आर्थिक धोरणांशी असलेला संबंध स्पष्ट करत,अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी या विषयाकडे केवळ अभ्यासापुरता न पाहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीनेही लक्ष देणे,आवश्यक असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुधीर भोईर यांनी केले. कार्यक्रमास प्रा.जितेंद्र राऊत, उपस्थित होते.
कार्यक्रमात कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारमंथनपर व्याख्यानांचा लाभ घेत, लोकसंख्या दिनाचे महत्त्व नव्याने समजून घेतले.

