जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,
जव्हार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा न्याहाळे खुर्द येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका सुलभा मोहिनीराज जोशी,त्यांच्या कन्या मृदुला गोखले,आणि पुत्र आशिष जोशी यांनी पुढाकार घेतला.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.तसेच,शाळा प्रवेश उत्सव आणि कैलासवासी मोहिनीराज जोशी ( माजी मुख्याध्यापक, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी लेझीम संचाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात तुलसी स्टील, सहकार नगर,पुणे यांच्याकडून पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चटईचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, पद्माकर भिसे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.कार्यक्रमावेळी सुलभा जोशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले व नियमित शाळेत येण्याची प्रेरणा दिली.त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. मिळालेल्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
सदर उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक म्हस्के,तसेच शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन योगिता चौधरी ( उच्च माध्यमिक शिक्षक ) यांनी समर्थपणे पार पाडले.अशा उपक्रमांद्वारे शाळा आणि समाज यामधील सृजनशील नाते दृढ होत असून,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सहभागाचे अनन्यसाधारण महत्व आहे.

