जव्हार प्रतिनिधी,
युवा अध्यक्षपदी संदीप माळी तर युवती अध्यक्षपदी सुवर्णा रावते यांची सर्वानुमते निवड,
सालाबादप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदाही जव्हार शहरात युवा आदिवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.या कार्यक्रमाचे नियोजन भक्कम आणि प्रभावी करण्यासाठी युवा आदिवासी संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड सभा काल हनुमान पॉईंट,जव्हार येथे पार पडली.
या निवड सभेला कोर कमिटी सदस्य,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेत सर्वानुमते संदीप माळी यांची युवा अध्यक्षपदी,तर सुवर्णा रावते यांची युवती अध्यक्षपदी आणि सोनाली महाले यांची युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार विक्रमगड विधानसभा आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी अध्यक्ष राजू भोये यांच्या मागच्या वर्षाच्या कामकाज अहवाल सादरीकरणाने झाली. त्यांनी आपल्या मनोगतात संघटनेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव आ. भोये यांच्या हस्ते करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आ.भोये म्हणाले, “ जागतिक आदिवासी दिन,हा आपल्या संस्कृतीचा गौरव दिवस आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता,सर्वांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने हा दिवस साजरा करावा.” त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
युवा अध्यक्ष संदीप माळी यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानत सांगितले, “ मी पारदर्शकतेने कार्य करेन व संघटनेच्या कामात सर्वांना सोबत घेऊन पुढील नियोजन करीन.” लवकरच नियोजन समितीची बैठक घेण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला युवा आदिवासी संघ माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला भगिनी, विविध गावांतील युवक-युवती आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

