जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,
हेल्पर्स चाईल्ड ग्रुपने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडोली येथील १०१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट आणि खाऊचे नूकतेच वाटप केले.’शैक्षणिक साहित्याच्या अभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये, अशा उदात्त हेतूने ही संस्था सामाजिक कार्य करत असते.यावेळी हेल्पर्स चाईल्ड ग्रुपचे संस्थापक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करताना, ” खूप खेळा, आणि अभ्यास करा.आपल्या समाजाच्या हितासाठी तुम्ही पण हेल्पर्स बना,” असा संदेश दिला.
शाळेच्या शिक्षिका दर्शना मुकणे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शैक्षणिक साहित्याबद्दल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आपण समाजाचे देणेकरी आहोत. आपले कार्य इतरांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक असावे.” त्यांनी आपल्या भाषणात संस्थेचे आभार मानले.आजच्या या कार्यक्रमाला वडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच कामिनी गावंढा,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश खुताडे,शाळेचे मुख्याध्यापक भगवान भोये, शुभांगी भांगरे,निलेश माळी, प्रदीप भरसट,रेशमा नागरे, जयेश वारघडे आणि हेल्पर्स चाईल्ड टीमचे सदस्य उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा आधार ठरला आहे.

