दीपक मोहिते,
” महानगरपालिका रणसंग्राम,”
” हिंदीची सक्ती,” महायुतीसाठी आत्महत्या ठरू शकते,
केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नसला तरी राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.” हिंदीची सक्ती,” हा एकमेव अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघा ठाकरे बंधूनी महायुतीला चांगलेच खिंडीत पकडले आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लादलेली ” हिंदीची सक्ती,” महायुती सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारचा आत्मघाती निर्णय घेऊन भाजपने ” हात दाखवून अवलक्षण,” अशी स्वतःची अवस्था करून घेतली आहे.सरकारला सुचलेली ही अवदसा,आम्हा इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते,अशा प्रतिक्रिया महायुतीमधून व्यक्त होत आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला ” हिंदी सक्तीची,” ही जी अवदसा आठवली,त्याविषयी मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटातही प्रचंड नाराजी आहे.पण शिक्षणमंत्री शिंदे गटाचा असल्यामुळे तसेच दिल्लीश्वरांची नाराजी ओढवून घेण्याचे धाडस नसल्यामुळे शिंदे गटाची अवस्था ” इकडे आड,तिकडे विहीर,” अशी झाली आहे.
केंद्र सरकारचा छुपा अजेंडा राबवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ” हिंदीची सक्ती,” महाराष्ट्रात करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार करायला हवा होता.आपल्या मातृभाषेबाबत महाराष्ट्राची जनता अतिसंवेदनशील आहे,हे फडणवीसांच्या लक्षात यायला हवे होते.पण मुंबई शहरातील बहुभाषिक मतदारांच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे त्यांनी केंद्राच्या आदेशानुसार ही सक्ती लादली आहे.त्यांच्या या निर्णयाचा फटका त्यांच्या मित्रपक्षांना ( शिंदे व अजित पवार गट ) राज्यातील उर्वरित महानगरपालिका निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे.फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा आत्मघाती असून या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या हाती एकप्रकारे “आयते कोलीत,” मिळाले आहे.या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांनी घेतलेल्या प्रखर भूमिकेला आता सर्व थरातून जोरदार पाठिंबा मिळू लागल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणले आहे.या प्रश्नावर राज व उद्धव हे दोघे जर एकत्र आले,तर महायुतीला आगामी निवडणुकीत महायुतीला दगाफटका होऊ शकतो.या दोघांचे या ज्वलंत प्रश्नावर येत्या जुलै महिन्यात वेगवेगळे मोर्चे निघत आहेत.पण काल राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यामुळे ” हिंदीची सक्ती,” हे प्रकरण महायुतीसाठी आत्महत्या ठरू शकते.

