सुरेश वैद्य,पालघर,
जव्हार आणि मोखाडा अंगणवाडी सेविका बनल्या प्रशिक्षक,
जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील मॉडेल अंगणवाडी सेविकांनी ” पालवी,” प्रकल्पाच्या सहाव्या स्तराचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी स्विकारली आहे. ” पालवी,” हा उपक्रम क्वेस्ट संस्थेने रोटरी क्लबच्या आर्थिक साहाय्याने,महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद पालघर यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये सुरू झाला.
२५ व २६ जून २०२५ रोजी मोखाडा येथील हिल व्ह्यू रिसॉर्ट येथे हे निवासी प्रशिक्षण संपन्न झाले.या प्रशिक्षणात क्वेस्ट संस्थेचे कल्पेश पाटील आणि पालिका मोरे यांनी सेविकांना प्रत्यक्ष शैक्षणिक कृतींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.अक्षर ओळख, लेखनवाचन,गणिती संकल्पना,गट खेळ, अभिनयगीत यांसारख्या कृतींमधून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, यावर भर देण्यात आला.जव्हार व मोखाडा तालुक्यांतील सर्व मॉडेल अंगणवाडी सेविका व सुपरवायझर या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणानंतर सेविकांनी आपल्या बीटमधील इतर अंगणवाड्यांमध्येही ही माहिती पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बालविकास ) व्यंकटराव हुंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार, प्रकल्प अधिकारी संदेश दुमाड,जागृती किरकिरे, कल्पना भोये,अमोल पाटील, जनसंपर्क अधिकारी श्रद्धा घरत आणि प्रकल्प व्यवस्थापक तुषार मराडे इ. अधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्ही.एम.हुंडेकर यांनी,“ पालवी,” प्रकल्पामुळे जव्हारमधील अंगणवाड्यांची स्थिती बदलत आहे. मिळालेली मदत योग्य वेळी लाभली असून,ते संचित सेविका निश्चितच पुढे नेतील.” असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
मोखाडा गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी सेविकांना उद्देशून सांगितले, “ ‘माझी अंगणवाडी,” १ ते ६ या पुस्तिकांचा संच दागिन्यांसारखा जपून ठेवा, जेणेकरून पुढच्या सेविकांनाही त्याचा उपयोग होईल.पालवीचे काम महाराष्ट्रात आणि पुढे देशभर व्हावे,अशीच सर्वांची इच्छा आहे.
प्रकल्प व्यवस्थापक तुषार मराडे यांनी अंगणवाडी सेविकांना, “ आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे.तयार केलेले दर्जेदार शिक्षण तालुकाभर पोहोचवणेहेच तुमच्या यशाचे पुढचे पाऊल आहे.”
प्रकल्प अधिकारी जागृती किरकिरे व प्रभारी अधिकारी कल्पना भोये यांनी अंगणवाड्यांना दिलेल्या भेटींमधून समाधान व्यक्त केले.
मुख्यसेविका सरला मेतकर यांनी अनुभव मांडताना सांगितले, “ पालवीमुळे अभिप्राय देण्याची पद्धत, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यात सकारात्मक बदल झाला आहे.”
या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविका आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत सक्रिय झाल्या असून,ग्रामीण भागातील बालशिक्षण अधिक सक्षम व प्रभावी होत आहे.

