सुरेश वैद्य,पालघर
प्रतिबंधात्मक कारवाई करावी – जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,
बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी नुकतेच दिले आहेत.
जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ. शशिकांत साळुंके तसेच सर्व तालुका आरोग्य् अधिकारी पोलिस विभागाचे प्रतिनीधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड म्हणाल्या की, समित्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांच्या अर्हतांची तपासणी पुर्ण करावी,अशी तपासणी एकदा पुर्ण झाल्यानंतर नवीन स्थापन होणारे दवाखाने कोणते आहेत ? व ते चालवणारे व्यवसायिक अधिकृत आहेत, की अनधिकृत यांचा शोध घेणे समितीस सोपे होईल.
तपासणीत अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावेत.तसेच समाज माध्यम व इतर ठिकाणावरुन प्राप्त होणाऱ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन तपासणी करावी व बोगस डॉक्टर आढळुन आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिले.

