जव्हार प्रतिनिधी,
ज्येष्ठ नागरिकांचे शिष्टमंडळ शासकीय कुटीर रुग्णालयाच्या भेटीवर,
जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड हे आदिवासी बहुल तालुके असून येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असलेले जव्हार हे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखण्यात येते.
जव्हार येथे असलेले पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो.इमारती,वैद्यकीय उपकरणे,बेड आणि आवश्यक साहित्य यामध्ये बरीच आधुनिक सुधारणा झाली आहे.मात्र,रुग्णालयात अद्याप तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, सर्जन नसणे,शस्त्रक्रिया न होणे,अतिदक्षता विभागाची अनुपलब्धता,तसेच डिजिटल एक्स-रे,एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. फिजिओथेरेपी उपकरणे असूनही त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नाही.
या भागातील आदिवासी रुग्ण दूरवर असलेल्या डोंगरदऱ्यांतून हे रुग्णालय गाठत असतात.मात्र,गंभीर आजाराच्या रुग्णांना वापी, सेल्वासा,नाशिकसारख्या शहरांमध्ये हलवावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असताना देखील अशा प्रकारची गैरसोय होणे,ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
या पार्श्वभूमीवर जव्हार तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या शिष्टमंडळाने शासकीय कुटीर रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.धनंजय कावळे यांची भेट घेतली. रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात
सध्या बंद असलेली डायालिसिस सेवा तातडीने सुरू करावी,
पावसाळ्यामुळे होणारे आजार उदा.जुलाब,उलट्या,त्वचारोग आदी आजारांवर उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करावा,
सर्पदंश आणि मोकाट कुत्र्यांच्या चाव्यांवर लस व औषधे रुग्णालयात उपलब्ध असावीत,
दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यासाठी वेळेवर आणि चालक ठेवावा,
गरोदर महिलांचे सुरक्षित बाळंतपण या रुग्णालयातच होण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ व सुविधा उपलब्ध कराव्यात,
फिजिओथेरेपी विभागाचा रुग्णांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, केवळ नावापुरता उघडा ठेवू नये,
यावर उत्तर देताना डॉ.कावळे यांनी सांगितले की, डायालिसिस सेवा पूर्वी खासगी संस्थेतर्फे चालवण्यात येत होती,ती सेवा बंद झाल्यामुळे दुसऱ्या संस्थेतर्फे लवकरच सेवा सुरू करण्यात येईल.दूषित पाण्यासंदर्भात नगरपरिषदेला सूचनाही देण्यात आल्या आहेत.सर्पदंश व कुत्रा चावण्यावर उपचारासाठी आवश्यक औषधे व लस उपलब्ध आहेत.
रुग्णांच्या सेवेकरिता सध्या आठ रुग्णवाहिका कार्यरत आहेत व सर्व चालकांचे संपर्क क्रमांक लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय, राज्य शासनाची आपत्कालीन सेवा म्हणजे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा रुग्णांसाठी उपलब्ध आहे.
डॉ.कावळे यांनी यावेळी सांगितले की,सध्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एकदा उपलब्ध असतात. मात्र,पहिल्या जुलैपासून ते कायमस्वरूपी उपलब्ध होतील.तसेच फिजिओथेरेपी कक्षासाठी आवश्यक सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे रुग्णांसाठी काही सकारात्मक बदल घडतील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

