दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी ; विश्लेषण,
जग विनाशाच्या वाटेवर….
इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची व्याप्ती आता वाढत चालली आहे.हमास व हिजबुल्लाह याना नामशेष केल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा इराणकडे वळवला आहे.वास्तविक इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्याचे काहीच कारण नव्हते.पॅलेस्टाईन,हमास व हिजबुल्लाह यांना इराण,सीरिया,येमेन व तुर्कस्तान,या देशाकडून आर्थिक व संरक्षण साहित्याची मदत करण्यात येते.त्यामुळे इस्त्रायल व अमेरिका ही दोन राष्ट्रे या मुस्लिम देशांना सतत पाण्यात पाहत असतात.अमेरिका हा एक व्यापारी देश असून तो आपला व्यापार वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जात असतो.इराण,इराक कुवेत व सौदी अरेबिया,तुर्कस्तान,इजिप्त व जॉर्डन ही राष्ट्रे तेलसंपन्न राष्ट्रे असून,जगातील एकूण तेल उत्पादनापैकी ४० % तेलउत्पादन इराणमध्ये होत असते.तर इराण व इराक आपले तेल रशिया,चीन,उत्तर कोरिया,पाकिस्तान व भारताला स्वस्त दरात विकत असतो.त्यामुळे अमेरिकेला आपले तेल चढ्या भावाने विकता येत नाही.परिणामी या सर्व मुस्लिम राष्ट्रांना अमेरिका आपला शत्रू मानतो.वरील मुस्लिम राष्ट्रापैकी सौदी अरेबिया हा मात्र अमेरिकेशी मैत्री टिकवून आहे.
सौदी अरेबिया,हा सुन्नी मुस्लिम देश आहे,तर इराण हा शिया देश आहे.या पंथात हजारो वर्षापासून शत्रुत्व आहे.

त्यामुळे अमेरिकेने ” डिव्हाईड अँड रुल,” या ब्रिटिशांच्या कुटील नितीनुसार सौदी अरेबियाला जवळ केले आहे.तसेच सौदी अरेबिया ही मोठी बाजारपेठ असून अमेरिका,या देशाच्या कायम पाठीशी राहिला आहे.सौदी अरेबियातून अमेरिका मोठ्याप्रमाणात तेल खरेदी करत असतो.शिया व सुन्नी या दोन पंथात मोहम्मद पैंगबरानंतर त्यांचा वारस कोण असावा,यावरून प्रचंड मतभेद आहेत.त्यामुळे शिया व सुन्नी प्राबल्य असलेल्या देशांमध्ये अनेकदा रक्तरंजित लढाया झाल्या.व्यापारी दृष्टिकोन राखणाऱ्या अमेरिकेने सौदी अरेबियाला कायम पाठीशी घातले व इराण/ इराकला सतत आपला शत्रू मानले.त्यामुळे रशिया,चीन,पाकिस्तान तुर्कस्तान,उत्तर कोरिया,या पाच देशांनी इराणला साथ दिली.पॅलेस्टाईनला मध्य आशियात इस्रायलचे अस्तित्व मान्य नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आजवर अनेक युद्धे झाली.पण या युद्धात प्रत्येक वेळी पॅलेस्टाईनला पराभव पत्करावा लागला.२०१४ पर्यंत आपण मात्र या संघर्षापासून लांब राहिलो.पॅलेस्टाइनचे सर्वोच्च नेते यासर अराफत हे आपले जवळचे नेते होते.ते व आपल्या तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या दोघांचे नाते बहीण भावांचे होते.त्याकाळी आपले व इस्रायलचे कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते.दोन्ही देश एकमेकांना व्हिसा व पारपत्र सुविधा देखील देत नसत.मोदी सरकारने सत्तेत आल्या आल्या,आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला व ज्या रशिया सोबत सहा दशके आपले घनिष्ट संबंध होते,ते मोदी यांनी मोडीत काढले व ” अबकी बार ट्रम्प सरकार,” अशी हाकाटी देण्यास सुरुवात केली.एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनी अलिप्ततावादी चळवळीला बळ दिले होते.त्या चळवळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुंग लावला व आपला देश अमेरिकेच्या कच्छपी लागला.त्यामुळे दक्षिण आशियामध्ये अमेरिका,इस्रायल व आपण,असे नवीन समीकरण उदयाला आले.या समीकरणामुळे अनेक मुस्लिम राष्ट्रे आपल्या विरोधात गेली.पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना पायबंद बसावा म्हणून मोदी यांनी ही राजकीय खेळी केली,पण अमेरिकेने ती यशस्वी होऊ दिली नाही.आपल्या समोर मैत्रीचा हात पुढे करताना त्यांनी पाकिस्तानला आर्थिक व लष्करी साहित्याची मदत देणे सुरूच ठेवले.अमेरिका हा एक पाताळयंत्री देश असून ज्या देशाशी तो मैत्री करतो,त्याच देशाचे लचके तोडण्यास तो मागे पुढे पाहत नाही.बांगला देश,पाकिस्तान,नेपाळ,
श्रीलंका,म्यानमार या देशांना अस्थिर करण्याचे त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत.दक्षिण आशियात भारत महासत्ता होता कामा नये असा त्यांचा उद्देश आहे.नेपाळ व बांगला देशात आज आपल्या विरोधात जी काही कटकारस्थाने होत असतात,त्याला अमेरिकेची फूस आहे,हे आता लपून राहिलेले नाही.अशी परिस्थिती असतानाही रशिया हा आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून येत असतो.
इस्रायलने इराण विरोधात जी आघाडी उघडली आहे,त्यालाही अमेरिकेचीच फूस आहे.इस्रायल सोबत अमेरिका देखील या युद्धात उतरली आहे.इराणला कायमचे नेस्तनाबूत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही राष्ट्रांनी इराणवर प्रचंड बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण जगाची वाटचाल,आता तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने सुरू झाली आहे.मात्र या युद्धामुळे अनेक देश होरपळणाऱ आहेत.

