वसंत भोईर,वाडा
संरक्षक भिंतीच्या बांधकामात केला दगडांचा वापर ; भिंत पाडण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश
वाडा नगरपंचायत हद्दीत कवटेपाडा रस्त्यालगत नगरपंचायतीतर्फे सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामात ठेकेदाराने सर्रास दगडांचा ( डबर ) वापर करत निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे. याविरोधात तक्रारी झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हे संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश ठेकेदाराला बजावले आहेत. त्यामुळे विकासकामांतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वाडा नगरपंचायत हद्दीतील कवटेपाडा मधील बांबेरे यांच्या घरालगत संरक्षक भिंत बांधणे, हे सुमारे ९० लाख रु. अंदाजपत्रकीय तरतूद असलेले काम माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला देण्यात आले होते.या ठेकेदाराने संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना राजरोसपणे दगडांचा ( डबर ) वापर केल्याचे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केले होते. तर या नित्कृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते वैभव पालवे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती.त्यानंतर नगरपंचायतीचे प्रकल्प सल्लागार मे.अतुल कुडतरकर अँड असोसिएटस यांनी आपला अहवाल देत या संरक्षक भिंतीच्या बांधकामात दगडांचा वापर केल्याचे मान्य केले.त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या शहर अभियंत्यांनाही अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. शहर अभियंत्यांनीही संरक्षक भिंतीच्या बांधकामात दगडांचा ( डबर) वापर केल्याचे आपल्या अहवालात नमूद केले.अखेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला संबंधित संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्याने माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने आजवर केलेल्या सर्वच बांधकामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असताना या बांधकामात राजरोसपणे दगडांचा वापर होत असल्याची बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ठेकेदाराने बांधकाम सुरू ठेवले होते.मात्र आता निकृष्ट दर्जाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे.
वाडा नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाकडून होणाऱ्या विविध विकासकामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. यासंदर्भात नागरिक तक्रारी करत असतातपरंतु प्रत्यक्षात कारवाई होत नाही.या प्रकरणात माही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडण्यायासंदर्भात नोटीस बजावली असली तरी अधिकारी आणि ठेकेदाराचे हितसंबंध पाहता प्रत्यक्षात कारवाई होईल का ? याबाबतीत शंका व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे या बांधकामाची मेरी ( महाराष्ट्र इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट,नाशिक) या संस्थेकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात येणार आहे.

