सचिन परब,वसई
वसई – नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट,
नवघर पूर्वेस औद्योगिक वसाहतीत एका औद्योगिक गाळ्यात स्फोट झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमध्ये एकजण जखमी झाला आहे.येथे काम करणाऱ्या पाच जणांना वाचवण्यात आले आहे.
वसई पुर्वेस औद्योगिक वसाहत आहे.या वसाहतीत शेकडो लहानमोठे कारखाने आहेत.काल मनीष इंडस्ट्री नं.१ मधील पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर ११४ मध्ये सकाळी ८:३० च्या सुमारास अचानक एक भीषण स्फ़ोट झाला.प्रथमदर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की गाळाचे ग्रील,सज्जे उडून शेजारच्या दुस-या इमारतीवर जाऊन धडकले.या दुर्घटनेत ११३ नंबर तसेच इतर गाळ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दल,रुग्णवाहिका,महावितरण तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी खबरदारीचे उपाय योजले.या औद्योगिक क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत.तसेच येथील अनेक कारखान्यात सुरक्षिततेची खबरदारी घेतली जात नाही. येथील उद्योजक महानगरपालिका,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,कामगार उपायुक्त व पोलीस येथील उद्योजकांच्या गैरकारभाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात अधुन मधून अपघात होत असतात.

