वसंत भोईर,वाडा
सततच्या पावसाने नेहरोली येथे रस्ता खचला,
वाडा -भिवंडी महामार्गावरील नेहरोलीस्थित पेट्रोल पंपाजवळ रस्ता खचल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या एकेरी महामार्गाची तत्काळ दुरुस्ती करून वाहन चालकांना दिलासा द्यावा,अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या मार्गावर प्रचंड खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. हा मार्ग नेहरोली येथे खचला असुन, रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता प्रशासनाची पोलखोल झाली आहे.पावसाची जर संततधार अशीच सुरू राहिली तर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होईल,अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.शिवाय मुंबई- अहमदाबाद महामार्गावर कालपासून वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गावरही वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे.त्यामुळे या मार्गावर ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.वाहने कासवाच्या गतीने खड्ड्यांचा अडथळा दूर करत सध्या संस्थगतीने मार्गक्रमण करत आहेत.

