जव्हार प्रतिनिधी,
थकीत अनुदान द्या – आ. विलास तरे,
“बोईसर – तारापूर एमआयडीसीमधील वस्त्रोद्योगांचा झोन बदलून संबंधित उद्योगांना थकीत असलेले भांडवली व विजेचे अनुदान तात्काळ द्यावे,” अशी ठाम मागणी आ.विलास तरे यांनी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
यावेळी आ.तरे यांनी संबंधित विभागाची विद्यमान स्थिती स्पष्ट करताना सांगितले की, ” बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या अनेक वस्त्रोद्योगांना शासनाच्या अनुदान योजनेचा योग्य लाभ मिळत नाही. कारण,या भागाचा वस्त्रोद्योग झोन ” मुंबई क्षेत्र,” म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे, ज्यामुळे मिळणारे अनुदान अत्यल्प असून त्याचे वेळेवर वितरणही होत नाही.”
या झोनिंगमुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असून, अनेक उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.परिणामी, काही उद्योग गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे आ.तरे यांनी स्पष्ट केले आहे.
” पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल व औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे.येथील तरुणांना रोजगाराच्या संधी टिकवणे आणि उद्योगांचे स्थलांतर टाळण्यासाठी, झोन बदलून उद्योगांना श्रेणी क्र.०२ झोनप्रमाणे किंवा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने विशेष सवलती व थकीत अनुदान दिले पाहिजे,” असे आ. तरे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.
यावर प्रतिसाद देताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी आ.तरे यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असून, ” संबंधित प्रकरणाचा सखोल आढावा घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल,” असे आश्वासन दिले आहे.

