दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बडगुजर यांनी नितेश राणे यांचा पोपट केला,
बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता समवेत पार्टी करणारे सुधाकर बडगुजर हे आज कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांच्या नाकावर टिच्चून भाजपवासी झाले.त्यांच्या या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांची अवस्था पाहून अक्षरशः कींव करावीशी वाटली.म्हणून राजकारणात वावरताना खूप सांभाळून बोलावे लागते,वागावे लागते.नितेश राणे हे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.ते जी काही भूमिका घेतात,त्यांच्या प्रत्येक भूमिकेला स्वपक्षातूनच विरोध होत असतो.आजच्या घटनेने त्यांचे सर्वत्र हसं झाले.गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी बडगुजर यांचे कार्ड वापरण्याचे ठरवले व प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाजन यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ” अबकी बार शंभर पार,” अशी घोषणा दिली.विजयासाठी भाजपला कोणीही चालतो,ही गोम नितेश राणे यांना कळायला हवी होती.
त्यानंतर नितेश राणे माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सारवासारव करताना पाहायला मिळाले.ते काय म्हणाले पहा,कोणी जर हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असेल तर त्यांच्या प्रवेशाला विरोध करण्याचे काम नाही.यालाच म्हणतात,” चोराच्या उलट्या बोंबा,” विधिमंडळात बेंबीच्या देठापासून कोकलणारे व सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांची छायाचित्रे फडकवणाऱ्या नितेश राणे यांची प्रतिक्रिया देताना ततपप झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने ” याची डोळा,याची देहा,” पाहिले.म्हणून नितेश राणे यांनी सर्वप्रथम भाजपची संस्कृती आपल्या अंगी बाणावी,अन्यथा पावलोपावली त्यांचा पोपट होत राहणार.

