वसंत भोईर,वाडा
वाड्याची अंकिता घोडविंदे मुंबई पोलीस सेवेत दाखल,
वाडा तालुक्यातील घोडविंदेपाडा येथील अंकिता नामदेव घोडविंदे हीने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले.आता ती मुंबई पोलीस दलात सेवेत दाखल झाली आहे.घोडविंदेपाडा गावातील ही पहीलीच मुलगी पोलीस सेवेत रुजू झाली असून आईवडीलांसह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.अंकिताच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्रित येऊन ढोल- ताशांच्या गजरात गावभर तीची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले.
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या अंकिताने अनेक अडचणींना सामोरे जात आपले शिक्षण पूर्ण केले.तर लहानपणापासून तीने पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले होते.त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तीने अथक परिश्रम केले.अंकिताचे यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे,तर संपूर्ण गावातील तरुणाईसाठी प्रेरणादायक ठरले आहे.स्वप्न मोठं असावं,पण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत हाच एकमेव पर्याय आहे. हे तीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.तिच्यावर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

