जव्हार,प्रतिनिधी
जव्हार येथे गुणवंतांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न.
-
जव्हार येथे युवा आदिवासी क-ठाकूर समाज सांस्कृतिक, सामाजिक,क्रीडा व संस्कृती संवर्धन मंडळ यांच्यातर्फे समाजातील यशस्वी, प्रेरणादायी व कार्यरत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात युवकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानू यशू माळी होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवराज मोरघा यांनी उपस्थित राहून युवकांना आधुनिक काळातील शिक्षणाचे महत्त्व, कौशल्यविकास आणि नेतृत्वगुण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी स्वकष्टावर विश्वास ठेवत संधी निर्माण करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांचे भाषण,त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत सैन्यात कसे यशस्वी स्थान मिळवले,याविषयी थक्क करणारा प्रवास मांडला. त्यांच्या अनुभवांनी युवकांमध्ये देशभक्ती,शिस्त आणि चिकाटीचा प्रेरणादायी संदेश दिला.मार्गदर्शनासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये अनेक मान्यवरांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या आयोजनात युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.मंडळाचे अध्यक्ष संजय रानडा,सचिव कल्पेश भोगाडे,उपाध्यक्ष वसंत पढेर,खजिनदार कांतीलाल कोरडा,सह खजिनदार राजेंद्र डबाळी, मुख्य सल्लागार संदीप माळी, सल्लागार विलास खुताडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरांतील नागरिक,महिला,ज्येष्ठ,युवक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उपस्थित मान्यवरांनी राजकारणाच्या पलीकडे जात समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश दिला.”हा कार्यक्रम कोणत्याही एका व्यक्तीचा नाही,तर आपल्या सर्वांचा आहे.हा सन्मान म्हणजे समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आहे,” असे सांगत उपस्थितांचे आभार मानण्यात आले.कार्यक्रमाची सांगता सामाजिक सलोखा,युवा प्रेरणा आणि पुढील उपक्रमांना सक्रीय पाठिंबा देण्याच्या निर्धाराने करण्यात आली.

