अविनाश तारकर,रोहा
कोलाड येथे कोकण आर्ट व्हिलेज प्रकल्पाला सुरुवात,
पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.रविंद्र प्रभू देसाई यांच्या उपस्थितीत आज ग्लोबल कोकण आर्ट विलेज या प्रकल्पाची सुरुवात झाली.
मुंबई – कोकण महामार्ग कोलाड येथे ग्लोबल कोकण चळवळीचे कायमस्वरूपी केंद्र आजपासून सुरू झाले.स्व. रमेश घोणे यांच्या अजरामर वकलाकृतींचे म्युझियम त्याचबरोबर कोकणातील संपूर्ण खाद्यसंस्कृती जगासमोर आणणारे हॉटेल ” आजीची आठवण,” आणि कोकणातील उत्पादनांचे कोकण खजिना दालन या ठिकाणी आजपासून सुरू झाले.पहिल्याच दिवशी या उपक्रमाला कोकण प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला.
स्व.रमेश घोणे यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न करून निर्माण केलेले काष्ठ शिल्प म्युझियम याचे भव्य प्रमाणात सादरीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने होत आहे.कोकणातील पारंपारिक खाद्यपदार्थ,मऊ भात,मोदक , फणस मिल्क शेक,फणसाची भाजी,रानभाज्या, बोंबील,सोडे,कोंबडी वडे व सह्याद्री मटन,असं संपूर्ण कोकणच्या खाद्यसंस्कृतीची
अनुभव देणारी सफर हॉटेल आजीची आठवण आजपासून याच ठिकाणी सुरू झाले. पालघरचा वाडा कोलम,गीनी तांदूळ,मालवणची सोलकडी,गुठळीचा आमरस, फणस आणि चिकूचे वेफर्स, असे अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने ग्लोबल कोकणच्या कोकण खजिना दालनामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गोवा कला एकादमीप्रमाणे कोकणचे कोकण कला दालन ही संकल्पना यानिमित्ताने आजपासून सुरू झाली.स्व. रमेश घोणे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अजरामर कलाकृती आणि त्याचबरोबर कोकणातील अनेक कलावंतांना व्यासपीठ करण्याचे काम ग्लोबल कोकण आर्ट व्हीलेज करणार आहे.पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकानी या केंद्राला भेट दिली व येथील खाद्यसंस्कृती आणि म्युझियमचा आनंद लूटला.पुण्यातून पर्यटकांचा एक ग्रुपने आज पहिल्याच दिवशी या केंद्राला भेट दिली.
कोकण चळवळीतील अनेक शिलेदार,या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.त्यामध्ये वसई – विरारचे माजी महापौर राजीव पाटील,ग्लोबल कोकण सहकार विभागप्रमुख प्रशांत काळे,जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर,अमित घोणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेता शेतकरी सचिन कार्येकर,व अन्य मान्यवर यांचा समावेश होता.

