वसंत भोईर,वाडा
प्रदूषणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात ; तोरणे शाळा बंद ठेवण्याचा इशारा,
वाडा तालुक्यातील तोरणे ग्रामपंचायत हद्दीतील मे. शिवकृपा स्टील अँड अलाइज प्रा.लि.या रासायनिक कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे.परिणामी,या परिसरातील नागरिकांचे व जि.प.शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी या कंपनी विरोधात लेखी व तोंडी तक्रारी केल्या,मात्र कंपनी मालक त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कंपनी ठोस उपाययोजना करत नाही,तोवर शाळा बंद करण्याचा इशारा भूमिपुत्र विकास फाउंडेशनने दिला आहे.
मे. शिवकृपा स्टील अन अलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून निघणारा घातक धूर दिवसाढवळ्या हवेत सोडला जातो.या वायुप्रदूषणामुळे शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या आरोग्याला तसेच हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनासह,प्रदूषण नियंत्रण मंडळ,वाड्याचे तहसीलदार, लोकप्रतिनिधी यांना याबाबत निवेदन देऊन कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र,आजवर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे भूमिपुत्र विकास फाउंडेशन कडून सांगण्यात आले.
कंपनीच्या विरोधातील नागरिक व भूमिपुत्र विकास फाउंडेशनची निवेदने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवली आहेत.प्रदूषण तपासणी करण्याचे काम प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आहे.
– भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार वाडा

