वसंत भोईर,वाडा
गातेस – वाडा येथे अविष्कार बालसंस्कार शिबिर संपन्न,
वाडा तालूकाच्या गातेस या गावात अविष्कार बालसंस्कार शिबिराची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली होती.काल या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला.या बालसंस्कार शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
मुलांना संस्कारक्षम करण्याचे काम पालक व शिक्षक करत असतात.आज अधुनिकतेच्या युगात लहान मुले मोबाईल,टिव्ही,व्हिडिओ गेममध्ये गुरफटलेली पाहायला मिळतात. शाळांना सुट्या पडल्या की ती आणखी मुक्त होतात.पालकांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडे हवे तसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यात विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांचे लाड पुरवणारे आजी- आजोबा, काका – काकू यांच्याकडून त्यांना संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा भावनिक संवाद तुटतो.अशावेळी आयोजित करण्यात येणारी बालसंस्कार शिबिरे आज काळाची गरज बनली आहेत.ग्रामीण विद्यार्थी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय गातेस येथे अविष्कार उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत गातेसच्या परीसरातील कोळकेवाडी, पाहुणीपाडा,कोने, शिरीषपाडा,गांध्रे,वाडा येथून पन्नासहून अधिक विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. सोळा विद्यार्थीच्या सहभागाने सुरू झालेले हे शिबीर आज पन्नास शिबिरार्थ्यांपर्यंत पोहचले आहे.
अनेक क्षेत्रातील नामवंत वक्ते मार्गदर्शक म्हणून विद्यार्थीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपस्थित राहत असतात.डॉ.भाई वलटे व भक्ती वलटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराची सुरवात झाली.चित्रकार विजय जोगमार्गे,चित्रकार विठ्ठल विशे,उपक्रमशील शिक्षक किशोर काठोले,शिक्षिका साधना भानुशाली यांनी आपला अमूल्य वेळ देऊन मुलांना चित्रकला,हस्तकला,अभिनय व कृतियुक्त गीते शिकवली. शिक्षिक संजय गोतारणे,महेश गोतारणे,प्रतिभा गोतारणे यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.गातेस गावातील दानशूर ग्रामस्थ उल्हास गोतारणे, अजय गोतारणे व योगेश पाटील यांनी मुलांच्या खाऊ व नाश्ताची व्यवस्था केली.या शिबिरात संतोष वेखंडे अध्यक्ष वसई विरार कुणबी समाज मंडळ,जगदीश चित्ते वाडा, ईशा नाईक,प्रशांत गोतारणे – उपसरपंच ग्रामपंचायत गातेस यांनी भेट दिली व मुलांना शैक्षणिक साहित्य,चित्रकला वह्या,वर्षभर अभ्यासासाठी वह्या,खाऊ इ.साहित्य दिले. संस्कारक्षम वयात मुलांना योग्य मार्गांवर ठेवण्याचे काम सार्वजनिक वाचनालय गातेस करत आहे.ते पंचक्रोशीतील मुलांना प्रगतीची दिशा दाखवेल,यासाठी आम्ही नेहमीच त्याच्या पाठीशी राहू, अशी भावना या शिबिराचे आयोजक रामकृष्ण लोहार,निलेश गोतारणे व योगेश गोतारणे यांनी यावेळी व्यक्त केली.

