कोगदे गावचे डॉ. अजय डोके झाले पहिले आयएएस अधिकारी,
जव्हार प्रतिनिधी-
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम कोगदे गावातील सुपुत्र डॉ. अजय काशीराम डोके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, ते कोकण विभागातून आयएएस होणारे पहिले आदिवासी, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाजातून तिसरे आयएएस अधिकारी ठरले आहेत.
या अभूतपूर्व यशाच्या निमित्ताने कोगदे गावात भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक आदिवासी वाद्यांचे निनाद, सांबळीच्या गजरात गावकऱ्यांनी डॉ. डोके, त्यांच्या पालक, तसेच गुरू सुरेश भोये यांचे जल्लोषात स्वागत केले. गावकऱ्यांनी आरती ओवाळून, फुलांचा वर्षाव करत त्यांचा सन्मान केला.
यावेळी डॉ. अजय डोके यांच्या हस्ते गावातील दहावी, बारावी, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवोदय व एकलव्य परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे विनू भोये आणि हरिश्चंद्र भोये यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
हा सत्कार समारंभ केवळ डॉ. डोके यांच्या यशाचा उत्सव नव्हता, तर ग्रामीण व आदिवासी भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा एक ऐतिहासिक क्षण होता.
याच दिवशी देवमाणूस कै. पांडुरंग त्रिंबक घेगड वाचनालयाचे उद्घाटनही डॉ. डोके यांच्या हस्ते पार पडले.या
समारंभात बोलताना डॉ. डोके म्हणाले, “आत्तापर्यंत अनेक परीक्षा दिल्या, यश मिळाले. पण आज कोगदे गावातील ही मिरवणूक आणि सत्कार पाहूनच खऱ्या अर्थाने समजले की मी खरोखर एक मोठं यश मिळवलं आहे.”

