नवीन पाटील,सफाळे
जलसार – नारंगी रो-रो सेवेमुळे नवजात बालकाचे वाचले प्राण…
अचानकपणे प्रकृती खालावलेल्या एका नवजात बाळासाठी जलसार – नारंगी दरम्यान सुरू करण्यात आलेली रो-रो सेवा एका बालकाला जीवदान देणारी ठरली आहे.सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती झालेल्या एका महिलेला दोन दिवसापूर्वी बाळ झाले.मात्र नवजात बाळाला श्वसनाचा त्रास सुरू झाला.त्याला रुग्णवाहिकेने विरारपर्यंत नेणे शक्य नव्हते.अखेर रो-रो व्यवस्थापनाकडे विनंती केल्यानंतर रात्रीच्या वेळी रो-रो सेवेतून रुग्णवाहिका नारिंगीपर्यंत नेण्यात आली.त्या बाळाला तातडीने उपचार मिळाले व या नवजात बालकाचे प्राण वाचले.त्यामुळे या भागासाठी ही रो-रो सेवा अति महत्त्वाची व सोयीची ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
विराथन खुर्द येथील रहिवासी असलेल्या अस्मिता जाधव यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली.सुखरूप प्रसुती झाली तरी नवजात बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. अशा अडचणीमध्ये डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला.
रात्रीच्या वेळी मुंबई-अहमदाबाद मार्गाने विरार येथील एका रुग्णालयात पोहोचण्यासाठी किमान दीड तासाचा अवधी लागणार होता.दरम्यान अलीकडे सुरू झालेली जलसार – नारंगी रो-रो सेवेची शेवटची फेरी संपली होती.मात्र बाळाला उपचाराची तातडीची गरज लक्षात घेता स्थानिक व गावातल्या नागरिकांनी रो-रो सेवा व्यवस्थापनाकडे विनंती करून फेरी सुरू करण्यास सांगितले.
आरोग्य विषयक सुविधा प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने तातडीने रो-रो सेवेमध्ये रुग्णवाहिका नेऊन ती खाडीच्या त्यापलीकडे अर्थात नारंगी जेटीवर केवळ पंधरा ते वीस मिनिटात सोडण्यात आली.त्यामुळे नवजात बाळ वेळेवर पुढील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले व त्या बाळाचा जीव वाचला.
जलसारचे उपसरपंच विकोष म्हात्रे यांनी जेटी व्यवस्थापक यांना विनंती करून फेरी बोट पुन्हा बोलावून रुग्णवाहिकासह बाळाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवले.यावेळी टेभीखोडावे पोलीस पाटील आवर्जून उपस्थित होते.जेटी झाल्याने त्याचा चांगला उपयोग होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

