जव्हार प्रतिनिधी,
आदिवासी वस्ती मुलभूत सुविधांपासून वंचित ; आ.भोये यांची प्रत्यक्ष भेट,
मोखाडा तालुक्यातील मोरांडा भागातील मुरबाटवाडी या आदिवासी वस्तीत आजही रस्ते,वीज,पाणी,आरोग्य, शाळा आणि अंगणवाडी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शेतमाळरानावर वसलेली ही वाडी गेल्या पन्नास वर्षांपासून अस्तित्वात असतानाही शासनाच्या योजनांपासून कोसोंदूर आहे.या वाडीत सध्या १८ कुटुंबे राहतात आणि सुमारे १२५ लोकवस्ती आहे. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार,वस्ती उशिरा वसल्याचे कारण देत अधिकारी अनेक वर्षांपासून विकासकामांना टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील महिलांनी आ. हरिश्चंद्र भोये यांच्या जव्हार येथील कार्यालयात भेट देऊन वस्तीतील समस्या मांडल्या. त्यानंतर आमदार भोये यांनी काल मुरबाटवाडीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.वस्तीमध्ये असलेली एकमेव विहीर कोसळल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच वीज, शाळा,आरोग्य केंद्र यांचा पूर्ण अभाव असून,शासनाच्या विविध योजना जसे की निराधार, अपंग, प्रौढ महिला योजना देखील या भागात पोहोचलेल्या नाहीत.
“आपल्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत असून लवकरच आवश्यक त्या सुविधा मुरबाटवाडीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन आ. हरिश्चंद्र भोये यांनी ग्रामस्थांना दिले.

