दीपक मोहिते,
सुरेश कलमाडी यांना १५ वर्षानंतर क्लीनचीट ; कार्यकर्त्यांकडून जल्लोष
ज्या कलमाडी विरोधात रान उठवण्यात आले, त्या कलमाडी यांना इडी व सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणानी आता निर्दोष ठरवले आहे.२०१० सालच्या राष्ट्रकुल ( कॉमनवेल्थ ) स्पर्धां आयोजनातील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना अखेर क्लीनचीट मिळाली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने तो स्विकारला.या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
२०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी विविध कंत्राटांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.सुरेश कलमाडी,तत्कालीन सरचिटणीस ललित भनोट यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरोधात आरोप करण्यात आले होते. आरोपानुसार,दोन महत्त्वाच्या करारांची अंमलबजावणी करताना गैरप्रकार झाले आणि ऑर्गनायझिंग कमिटीला अंदाजे ३० कोटी रु.चे नुकसान सहन करावे लागले.
या आरोपांच्या अनुषंगाने सीबीआयने प्रथम चौकशी सुरू केली आणि २०१४ मध्येच या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तपासात कोणतेही ठोस गुन्हेगारी पुरावे सापडले नाहीत आणि एफआयआरमधील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.या रिपोर्टनंतर ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगचा स्वतंत्र तपास सुरू केला होता.ईडीने तपासा दरम्यान सीबीआयच्या पुराव्यांचा अभ्यास करून असा निष्कर्ष दिला की,मनी लॉन्ड्रिंगचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांनीही आता कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला असून, विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी तो स्वीकारला आहे.
या निर्णयामुळे तब्बल १५ वर्षांनंतर सुरेश कलमाडी यांच्यावर लावले गेलेले भ्रष्टाचाराचे कलंक दूर झाले असून,त्यांच्या राजकीय अस्तित्वावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आता नाहीसे झाले आहे.एकेकाळी भारतीय खेळ क्षेत्रात प्रभावशाली भूमिका बजावणाऱ्या कलमाडी यांचं राजकीय करिअर या प्रकरणामुळे डळमळीत झालं होतं.पुण्यात त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचं स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी केली,पेढे वाटले आणि ” कलमाडी निर्दोष आहेत,” अशा घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी हा न्याय उशिरा का होईना,पण मिळाला अशी प्रतिक्रिया दिली.

