नदीम शेख,पालघर
पालघर येथे मजुरांना ७६ लाख रु.च्या गृहउपयोगी वस्तूंचे वाटप,
इमारती,वीटभट्टी व इतर कामावर मजुरी करणाऱ्या ९०० मजुरांना आज पालघर येथे ७६ लाख ५० हजार रु.ची संसारोपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई व कामगार उपायुक्त पालघर यांच्यातर्फे लायन्स क्लब सभागृह येथे करण्यात आला.
यावेळी पालघर विधानसभेचे आ.राजेंद्र गावित सहा.आयुक्त कामगार विभाग विजय चौधरी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, केदार काळे,राहुल घरत, सविता मल्लाह संजू धोत्रे आदी उपस्थित होते.
प्रत्येक लाभार्थ्याला ८ हजार ५०० रु.ची भांडी देण्यात आली.याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होणार आहे.याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे.
काळी माती ही आपली आई आहे ती विकू नका,आपला नवरा,आपली जमीन विकत असेल तर ती विकू देऊ नका विकल्यावर आपण पुन्हा दुसरी जमीन घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या आईला आपण विकू नये,तसेच आदिवासी पुरुषांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलांनी त्याला दारू पिण्यापासून परावृत्त करावे असे आवाहन यावेळी राजेंद्र गावित यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात महिला मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.पालघर जिल्ह्यात जीवित नोंदित झालेल्या कामगारांची संख्या ३१ हजार ९१८ असून १४ हजार ५७९ मजुरांना मंडळाकडून आठ कोटी पस्तीस लाख सत्तेचाळीस हजार दोन रु.चा लाभ आतापर्यंत देण्यात आला आहे.इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी २१ कामांचा बांधकामांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

