वसंत भोईर,वाडा
सरपंच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात,ग्रामसेवकांनी ठोकली धूम,
तालुक्यातील सापरोंडे -मागाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी १९ हजारांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याची माहिती या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किरण हरड यांना कळल्यानंतर आपली पण या प्रकरणी चौकशी होईल,या भीतीने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावून ते पसार झाल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने ठेकेदार या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे बिल काढण्यासाठी वारंवार हेलपाटे मारूनही केलेल्या कामाचे बिल मिळत नव्हते.संबंधित कामाचे बिल अदा करण्याची जबाबदारी सरपंचासह प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक हरड यांची होती.या प्रकरणात सरपंच गवारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक झाली. दरम्यान त्याचसुमारास कार्यालयात हजर असलेले ग्रामसेवक हे चौकशीचा ससे मिरा आपल्यामागे लागू नये या भीती पोटी कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले.

