जव्हार,प्रतिनिधी
जव्हार येथे रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी,
” जव्हारचा ढाण्या वाघ,” अशी ओळख असलेले व १९४२ च्या ” चले जाव,” आंदोलनात सक्रिय भाग घेतलेले खरवंद गावचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक वीर रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती आज जिल्हा परिषद शाळा चौक,तालुका जव्हार,केंद्र वाळवंडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वा.सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आली.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे पदवीधर शिक्षक रवी बुधर यांनी स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी म.गांधी यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आंदोलनात केलेल्या महान कार्याची आठवण करून दिली.विशेषतः पुणे येथील शनिवारवाड्यावरून इंग्रजांचा युनियन जॅक खाली ओढून,त्याजागी स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवणारा रेवजीभाईंचा पराक्रम, विद्यार्थ्यांच्या मनात स्फुलिंग चेतवून गेला.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते चौक येथील विद्यार्थिनींनी सादर केलेले स्वरचित,सुस्वर देशभक्तीपर गीत.या गीताच्या माधुर्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्रावण वातास,ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग गावित,सहशिक्षक मोतीराम काटेला,राजेश भोये,निलेश चौधरी,महेंद्र धिंडा,रुपेश सातपुते व विष्णू डंबाळी उपस्थित होते.सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना देशभक्ती,शौर्य व बलिदानाच्या मूल्यांची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन चौक शाळेतील शिक्षकांनी उत्साहात पार पाडले.रेवजीभाईंच्या कार्याचा गौरव करून,अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाच्या जयंतीदिनी नव्या पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचा हेतू साध्य झाला.

