नदीम शेख,पालघर
२६ एप्रिल रोजी पालघर येथे माध्यमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन,
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) यांचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ एप्रिल रोजी पालघर शहरातील स.तू.कदम विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी.के. थोरात तर स्वागताध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष नरसू पाटील आहेत.या अधिवेशनाचे आयोजक म्हणून पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जबाबदारी पार पाडणार आहे.
शिक्षकांच्या अडीअडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांची भूमिका या अधिवेशनातून मांडण्यात येणार आहे.यावेळी साधारण चार ते पाच हजार शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,शिक्षणमंत्री दादा भुसे,उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत,खा.हेमंत सवरा,भास्करराव भगरे,आ. राजेंद्र गावित,निरंजन डावखरे,विलास तरे,ज्ञानेश्वर म्हात्रे,अमोल पाटील, सत्यजित तांबे आदी उपस्थित राहणार आहेत.
पालघर येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून शोभायात्रा अधिवेशनाच्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष करणार आहेत.प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.व्रतस्थ संस्थाना यावेळी गौरवण्यात येणार आहे.तसेच जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शोधनिबंध सादरीकरण करण्यात येणार असून महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१ अंतर्गत चौकशी समितीचे वास्तव्य आणि उपाय यावर शोधनिबंध सादरीकरण करण्यात येणार आहे सादरकर्ते मुंबई विभाग माध्यमिक शिक्षक संघ आहेत. के.एस.ढोमसे कार्यवाह महाराष्ट्र पीडीएफ यांचे व्याख्यान दु.३.०० वाजता आयोजित करण्यात आले असून विविध पुरस्कारांचे वितरणही त्यावेळी करण्यात येणार आहे.पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकारणीचा सत्कार तसेच संध्याकाळी खुले अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.

