प्रतिनिधी जव्हार,
आदिवासी तरुण डॉ.अजय डोके यांचा युपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश,
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील दुर्गम कोगदा गावात राहणाऱ्या डॉ. अजय कांशीराम डोके या २७ वर्षीय युवकाने UPSC २०२४ परीक्षेत अव्वल नंबर पटकावत संपूर्ण जव्हार तालुक्याचा व पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.ते जव्हार तालुक्यातील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले आदिवासी तरुण ठरले आहेत.
डॉ.अजय डोके यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले असून,त्यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी कोगदा गावातच झाले.त्यानंतर त्यांनी ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश मिडीयम स्कुल ब्रम्हावॅली,त्र्यंबकेश्वर येथे पूर्ण केले.अभ्यासातील सातत्य व चिकाटीमुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही यश मिळवले. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय येथे पूर्ण केले.वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय,जव्हार येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली.सध्या ते मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.
डॉ.डोके यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित नसून,तो आदिवासी समाजासाठी एक प्रेरणादायी दृष्टीकोन तयार करणारा ठरला आहे.विशेष म्हणजे,त्यांची आई अशिक्षित असून वडील केवळ चौथीपर्यंत शिकले आहेत आणि सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.डोके यांनी आपल्या यशाचे श्रेय,आई-वडील व त्याचे मामा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार येथील प्रकल्प निरीक्षक यदुनाथ भोये व निवृत्त नायब तहसीलदार कमळाकर कुवरे यांना दिले. त्यांच्या प्रेरणा,मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले आहे.
डॉ.अजय डोके यांनी सांगितले की, “ ग्रामीण व आदिवासी भागातील मुलभूत आरोग्य सेवा,शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक सुविधांमध्ये सुधारणा करणे,हा माझा मुख्य उद्देश असून,अधिकारी म्हणून यासाठी मी कटिबद्ध आहे.”
त्यांच्या या यशामुळे ना केवळ कोगदा गावाचा,तर संपूर्ण जव्हार तालुका व पालघर जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे.ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा एक दीपस्तंभ ठरेल,यात शंका नाही.
डॉ.अजय डोके यांचे सर्वच स्तरातुन मनःपूर्वक अभिनंदन! होत आहे.

