सुरेश गिरंधले,मोखाडा
मोखाडा भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद झोले,
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन खोडाळा गटातील भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष मिलिंद झोले यांची निवड करण्यात आली आहे. मोखाडा येथील भाजपच्या कार्यालयात महिला जिल्हा सरचिटणीस तथा भाजप निवडणूक अधिकारी ज्योती भोये यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीतून निवडण्यात आलेल्या मोखाडा मंडळातील अध्यक्षपदाची धुरा तरुण कार्यकर्त्याकडे सोपवण्यात आल्यामुळे मंडळात उत्साहाचे वातावरण आहे.मिलिंद झोले यांनी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये खोडाळा गटात मोठे परिश्रम घेऊन भाजपला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्यांना सर्वसमंतीने तालुका अध्यक्षपद मिळाले. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीची मला जाण असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन,असा विश्वास नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिलिंद झोले यांनी व्यक्त केला.

