वसंत भोईर,वाडा
क्रशर मशीन अचानकपणे पुन्हा सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांनी पाच तास रोखला रस्ता,
तालुक्यातील गुहिर ग्रामपंचायत हद्दीत असलेली केशर मशीन ग्रामस्थांनी अर्ज विनंत्या करून बंद केली होती. ती अचानक पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हमरापूर – गाळत रे रस्ता पाच तास रोखून धरला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला.
गुहिर येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास हानिकारक व शेतीस विनाशकारी ठरलेली क्रशर मशीन ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बंद करण्यात आली होती.ती निवृत्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी २९ मार्च रोजी निवृत्त होण्याअगोदर परवानगी देऊन चालू केली असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.यावेळी सुमारे पाच तास मार्ग रोखून धरला होता.या क्रशर मशीनमुळे गावातील नागरिकांसह दोन जिल्हा परिषद शाळा,अकराशे विद्यार्थी शिक्षण घेत असलेली शासकीय आदिवासी आश्रम शाळा यांना प्रचंड त्रास होत होता.ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ही क्रशर मशीन बंद करण्यात आली होती.मात्र बोडके यांनी त्यांना सेवेतून निवृत्त होताना पुन्हा परवानगी दिल्याने ती पुन्हा सुरू झाली होती.त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत ग्रामस्थांनी पाच तास हा मार्ग अडवून आंदोलन छडले अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान ग्रामस्थांच्या मुळावर घाला घालणारी ही क्रशर मशीन बंद झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थ गणेश सांबरे यांनी यावेळी दिला.

