संगीता तावडे,मंत्रालय,
चिंचोटी-भिंवडी राज्यमार्गाचा तिढा सुटण्याची शक्यता,
चिंचोटी – कामण -भिवंडी राज्यमार्गाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसोबत आ.स्नेहा दुबे पंडित यांची मंत्रालयात बैठक नुकतीच पार पडली.
वसई तालुक्याचा भिवंडी तालूक्याशी जोडणाऱ्या चिंचोटी – कामण – भिवंडी या राज्य मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली असून वसई-विरार परिसरातील नोकरदार – कामगार – उद्योजक यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. दरवर्षी हा रस्ता दुरुस्त करण्यात येतो.पण तो पुन्हा पुन्हा फुटतो व रस्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण होत असते.
या प्रकरणी भाजपच्या आ.स्नेहाताई दुबे-पंडित यांनी विधानसभेच्या नागपूर येथील पहिल्याच हिवाळी अधिवेशनात या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यानंतर पुन्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता.या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल एक बैठक मंत्रालयात आयोजित केली होती.या बैठकीसाठी आ.स्नेहा पंडित यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी आवर्जून उपस्थित होते.या बैठकीत रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांचे होणारे हाल आ.स्नेहा दुबे पंडित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या निदर्शनास आणून तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. त्यावर विविध मुद्यांवर चर्चा होऊन लवकरच या मार्गाचे रखडलेले काम सुरू करण्यात येईल,असे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी त्यांना ठोस आश्वासन दिले.

