जव्हार प्रतिनिधी,
शैक्षणिक गुणवत्तेसाठी जव्हारमधील शिक्षकांचा अभ्यास दौरा,
जव्हार तालुक्यात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी जव्हारमधील ५० शिक्षकांनी नुकताच त्र्यंबकेश्वर येथील वंडर स्कूल,हिवाळी या शाळेचा अभ्यास दौरा केला. हा दौरा जव्हार गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडथळे दूर करणे,अध्ययन स्तर उंचावणे,पायाभूत साक्षरता आणि मूलभूत गणिती कौशल्ये विकसित करणे,तसेच शिक्षकांच्या नवनिर्मित क्षमतेला चालना देणे ही होती.
वंडर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान,गणिती क्रिया, वाचन-लेखन कौशल्य आणि संविधानाचे पाठांतर पाहून शिक्षक आश्चर्यचकित झाले. विशेष म्हणजे या शाळेत विद्यार्थी दोन्ही हातांनी लेखन करतात,संविधानातील अनेक कलमे तोंडपाठ आहेत आणि १ हजारच्या पुढील संख्यांचे पाढे हे विद्यार्थी सहज म्हणतात.ही शाळा वर्षभर म्हणजे ३६५ दिवस चालू असते.विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासासाठी हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.या शाळेतील शिक्षक केशव गावित यांनी शिक्षणातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांसमोर सादर केले. त्यामुळे जव्हारमधील शिक्षकांना नवीन दृष्टिकोन आणि उपक्रमांची दिशा मिळाली.अभ्यास दौऱ्यानंतर १५ एप्रिल २०२५ रोजी जव्हारमध्ये सर्व शिक्षकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत “ॲक्शन प्लॅन,,” तयार करण्यात आला असून, त्यामध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान व मूलभूत गणिती क्रिया,यावर लक्ष केंद्रित करून ठोस कृती आखण्यात आली आहे.यावेळी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी फॉलोअप सेशन घेण्यात आले.या बैठकीत विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची दिशा देण्यात आली.वंडर स्कूलमधील अनुभवातून प्रेरणा घेत जव्हारमधील शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवता येतील,असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.हा अभ्यास दौरा जव्हार तालुक्यातील शिक्षकांसाठी निश्चितच एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.

