वसंत भोईर,वाडा
एनएमएमएस परीक्षेत कोने शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,
केंद्र सरकारने ८ वीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय स्तरावर केलेल्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या एनएमएमएस ( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा ) परिक्षेत कोने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेच्या ४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.शाळेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी गट शिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
या परीक्षेला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा कोने या शाळेचे ८ वीचे ५ विद्यार्थी बसले होते. त्या परीक्षेचा १०० % निकाल लागला असुन आता शिष्यवृत्तीकरिता पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाडा तालुक्यातून एकूण ५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४ विद्यार्थी हे कोने शाळेचे आहेत.या पात्र विद्यार्थ्यांमध्ये मुस्कान सुलतान पठाण, सानिका अमोल जाधव,वैष्णवी जगदिश कदम, सुजित अंकुश जाधव यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच माजी गटशिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी परिक्षेकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुनिल शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान या शिष्यवृत्तीअंतर्गत १२ वी पर्यंत दरवर्षी त्यांना १२ हजार रु.चे अर्थसहाय्य मिळणार आहे.

