नाशिक प्रतिनिधी,
नाशिकमध्ये मध्यरात्री थरार ; जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक, ३१ पोलीस जखमी,
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात काल रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली आहे.या दगडफेकीत तब्बल ३१ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यामध्ये सहा.पोलीस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती.संबंधित धार्मिक स्थळ काढून घेण्याच्या सूचना नोटीसमधून देण्यात आल्या होत्या.दोन दिवसांत संबंधित धार्मिकस्थळ पाडण्यात येईल,असं सांगण्यात येत होतं. याबाबत अफवा पसरल्यानंतर काल रात्री उशिरा नाशिकमध्ये याचे जोरदार पडसाद उमटले. सुमारे ४०० जणांच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली.यावेळी जमावाने काही वाहनांचं देखील नुकसान केले.
जमावाने अंदाधुंद केलेल्या दगडफेकीत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ३१ हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले.रात्री उशिरा काठे गल्ली परिसरातील लाईट गेली होती.याचा फायदा घेऊन जमावाने पोलिसांना लक्ष्य केले.याप्रकरणी पोलिसांनी आता समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.दगडफेक करणाऱ्या जमावातील १५ हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.हल्लेखोरांच्या ५७ मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सायंकाळच्या सुमारास शहरात निरनिराळ्या अफवा पसरल्यानंतर तणाव वाढला. प्रशासनाने वेळेवर खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त वाढवला होता,तरीही मध्यरात्री जमावाने अचानक हिंसक रूप घेतले.काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असुन अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.शहरात तणावाची स्थिती कायम असून,प्रशासन घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहे.नाशिक पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

